हंगरगा (मुक्रमाबाद) येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणी पँथर सेनेची पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट!

नांदेड – हंगरगा (ता. मुक्रमाबाद) येथील मयत बालाजी सखाराम बोईनवाड (वय 24) यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणी आज ऑल इंडिया पँथर सेना, नांदेड तर्फे पीडित कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यात आले.
दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर बालाजी घरी परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी पोलीस पंचनामा करून प्रेत शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले.या घटनेविषयी मयताच्या परिवाराने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. परंतु आतापर्यंत पोलिस प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई झालेली नाही, अशी पीडित कुटुंबीयांची तक्रार आहे.
यासंदर्भात आज ऑल इंडिया पँथर सेना नांदेडचे जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली संघर्षनायक दिपकभाई केदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांना आधार देत न्यायासाठी ठाम पाठिंबा दिला. त्यानंतर मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात प्रशासनाला भेटून तपास काटेकोर, पारदर्शक आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे करण्यात यावा, अशी मागणी पँथर सेनेने केली.



