आमच्याबद्दल

जयभीम,

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी…
पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत.
आजच्या चळवळीने नवे रुप धारण केले आहे. आधुनिकता हा आजच्या चळवळीचा पाया झालेला आहे. पारंपारिक चळवळी संपुष्टात आलेल्या आहेत. या आधुनिक चळवळीत ऑल इंडिया पँथर सेना आणखी एक पाऊल पँथरनामा च्या माध्यमातून टाकत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “ज्या चळवळीला मुखपत्र नसते तिची अवस्था पंख छाटलेल्या पक्ष्यासारखी असते.”
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेविरोधात वैचारिक बंड केलं, विषमता गाडून टाकली. समतेसाठी संघर्ष केला.
पँथर चळवळीने रस्त्यावरील संघर्षातून आणि वैचारिक लेखणीतून जातीयवादी उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा हातात घेतला. सामाजिक स्वातंत्र्यासाठी, स्वाभिमानासाठी संघर्ष केला. या संघर्षात त्यांनी पत्रकारिता हे बळ वापरले आजही आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वात 70 वर्षानंतरही आमचे प्रश्न तेच आहेत. घरकुल, गायरान जमीन, दलित अत्याचार, सामाजिक मागासलेपण, आर्थिक नाकेबंदी, राजकीय गुलामगिरी याच आमच्या आजच्या मागण्या आहेत. जातीमुळे आम्हाला संपवलं जातं, पाणी नाकारलं जातं, दलितांनी मिश्या ठेवल्या म्हणून हत्याकांड होतात, प्रेम केलं म्हणून आम्हाला मारलं जातं, स्वाभिमानाने जगायला लागलो म्हणून मारलं जातं. आम्ही विचारतोय आमचं स्वतंत्र कुठंय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्ही गुलामीत का आहोत? ती गुलामगिरी नाकारण्यासाठी, जातीयतेचा कोरोना उद्धवस्त करण्यासाठी हा आधुनिक संघर्ष “पँथरनामा” उभा करणार आहे.
संसद, राष्ट्रपती भवन, मंत्रालय धार्मिक केंद्र बनायला लागली आहेत. धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक सत्ता निर्माण होत आहे. धर्मसत्ता संविधान संपवण्यासाठी सर्व शासकीय विभागाचे धार्मिकीकरण करत आहे. प्रतीकांची विटंबना, धार्मिक दंगली, इतिहासाचे विद्रुपीकरण, आरक्षण संपवण्यासाठी खाजगीकरण, अफाट महागाई, कामगारांचे शोषण, शेतकऱ्यांची कोंडी, शेतमजुराचा गुलामी, लोकशाही उद्धवस्त करण्यासाठी ईव्हीएम मशीन हे त्यांचे आधुनिक हत्यार आहेत. संविधानाच्या बळावर सत्ता मिळवायची, तिची धर्मसत्ता करायची आणि लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही निर्माण करायची ही आजच्या व्यवस्थेची पद्धत आहे.
त्यामुळे संविधान हाच आमच्या जगण्याचा, मूलभूत हककांचा आधार आहे. संविधान, लोकशाही, आरक्षण, मानवता वाचवणे, समाजरक्षण हाच आमचा मुख्य अजेंडा आहे.
समूहाची राजकीय पिछेहाट झालेली आहे. स्वतंत्र निळा झेंडा, अशोक चक्र, स्वतंत्र अस्तित्व, जयभीमचा नारा देऊन राजकीय अस्तीत्व निर्माण करण्याचा संघर्ष तीव्र करण्यासाठी या पोर्टलवर भूमिका मांडली जाईल. या आधुनिक चळवळीला साथ द्या!

दिपक केदार
संपादक पँथरनामा
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना

Back to top button
error: Content is protected !!