देशभक्ती म्हणजे गुलामी? देश संकटाच्या उंबरठ्यावर!

देश हा केवळ सीमा, झेंडे आणि घोषणांनी उभा राहत नाही…देश उभा राहतो तो सामान्य माणसाच्या श्रमावर, त्याच्या स्वप्नांवर आणि त्याच्या जगण्याच्या आशेवर.आज देशातील वातावरण पाहिलं तर एक भीती मनात घर करू लागली आहे. सत्ताधाऱ्यांच्या भाषणांतून “त्याग करा”, “खर्च कमी करा”, “प्रवास टाळा”, “सोनं घेऊ नका”, “तुटवडा येऊ शकतो” अशा सूचना दिल्या जात आहेत. पण प्रश्न असा आहे की, जर परिस्थिती इतकी गंभीर होती, तर जनतेला याची पूर्वकल्पना का दिली गेली नाही?देशाला आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं आणि जनतेला मात्र जाती-धर्माच्या वादांत, निवडणुकांच्या प्रचारात आणि भावनिक घोषणांमध्ये अडकवून ठेवलं गेलं.आज अचानक देशभक्तीच्या नावाखाली सामान्य माणसाला त्यागाची शिकवण दिली जाते आहे. पण देशभक्ती म्हणजे नेमकं काय?देशभक्ती म्हणजे प्रश्न न विचारणं का?देशभक्ती म्हणजे महागाई, बेरोजगारी, तुटवडा आणि आर्थिक संकट सहन करत शांत बसणं का?देशभक्ती म्हणजे स्वतः उपाशी राहून सत्तेच्या अपयशावर टाळ्या वाजवणं का?भारतीय जनता आधीपासूनच देशभक्त आहे.जो शेतकरी उन्हात राबतो, जो कामगार रात्रंदिवस श्रम करतो, जो तरुण रोजगारासाठी संघर्ष करतो, जी आई आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी उपाशी राहते — तेच या देशाचे खरे देशभक्त आहेत.त्यांना देशभक्ती शिकवण्याआधी त्यांच्या जगण्याची हमी देणं ही सत्तेची जबाबदारी आहे.आज परिस्थिती अशी निर्माण होत आहे की बाजारपेठा मंदावत आहेत, उद्योगांवर दबाव वाढतो आहे, महागाई सामान्य माणसाचा घास हिसकावत आहे. ट्रान्सपोर्ट थांबला तर लाखो चालक-कामगारांचं काय? व्यापार थांबला तर रोजंदारीवर जगणाऱ्यांनी जगायचं कसं?हा फक्त आर्थिक प्रश्न नाही; हा सामाजिक अस्तित्वाचा प्रश्न आहे.नोटबंदीच्या काळात देशाने अचानक निर्णयांचे परिणाम पाहिले. लोक रांगेत उभे राहिले, उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. आज पुन्हा तशाच भीतीचं वातावरण तयार होत आहे. उद्या कोणती नवीन गाईडलाईन येईल, कोणत्या व्यवहारांवर निर्बंध येतील, कोणत्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल — याची खात्री उरलेली नाही.म्हणूनच आज देशातील प्रत्येक नागरिकाने जागं होण्याची गरज आहे.जात-धर्माच्या भांडणांत अडकून आपलं भविष्य उद्ध्वस्त करून चालणार नाही. लोकशाही वाचली तरच देश वाचेल. संविधान जिवंत राहिलं तरच सामान्य माणूस जिवंत राहील.आज गरज आहे ती अंधभक्तीची नाही, तर जागरूक नागरिकत्वाची.प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही; तो लोकशाहीचा आत्मा आहे.देश वाचवायचा असेल तर माणूस वाचवावा लागेल.आणि माणूस वाचवायचा असेल तर संविधानाच्या मूल्यांसाठी संघर्ष उभा करावा लागेल.भारतीयांनो, सावधान व्हा…!कारण संकट जेव्हा दारात येतं, तेव्हा सर्वात आधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण लक्षात ठेवा — जागृत जनता हीच लोकशाहीची खरी ताकद असते.
— दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना



