Uncategorized

ड्रोन आकाशात उडतायत… पण सामाजिक न्याय अजून जमिनीवरच रडतोय! – दिपक केदार

आज महाराष्ट्रात सामाजिक न्याय हा शब्द फक्त भाषणांमध्ये, जाहिरातींमध्ये आणि इव्हेंटमध्ये उरला आहे का, असा प्रश्न सामान्य माणसाला पडू लागला आहे. मुंबईत ड्रोन उडत आहेत, आकाशातून विकास दाखवला जातोय; पण जमिनीवरचा माणूस अजूनही चिखलातच रुतलेला आहे. गावातील दलित वस्त्या आजही अंधारात आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये जगणाऱ्या लेकरांच्या डोळ्यांत अजूनही भुकेची झोप आहे. ऊसतोड मजुरांच्या हातांवरील जखमा अजूनही भरलेल्या नाहीत.सामाजिक न्याय मंत्री पद हे केवळ खुर्ची नाही, तर लाखो शोषितांच्या आशा-आकांक्षांचे ओझे आहे. हे खाते म्हणजे गोरगरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने आज त्या पदावरून संवेदनशीलतेपेक्षा गवगवा अधिक दिसतोय. राज्यात दलितांवर अत्याचार होतात, हत्याकांड घडतात, लेकरांचे संसार उद्ध्वस्त होतात; पण त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी सत्तेतील माणसं पोहोचत नाहीत. हीच सर्वात मोठी वेदना आहे.

आजही भूमिहीन माणूस जमिनीच्या प्रतीक्षेत आहे. दलित वस्त्यांचा निधी मध्येच गिळला जातो. शिष्यवृत्ती बंद पडल्याने गरीब विद्यार्थ्यांची स्वप्नं अर्ध्यावर तुटतात. तरुणांच्या हाताला काम नाही, उद्योगासाठी भांडवल नाही. दलित महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आहे. आणि दुसरीकडे सत्ताधारी यंत्रणा इव्हेंटच्या प्रकाशझोतात रमलेली दिसते.

ऊसतोड मजुरांचे जीवन तर या व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे. लेकरांना शिक्षणापासून दूर ठेवून हजारो कुटुंबं पोटासाठी राज्यो-राज्य भटकतात. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काबाडकष्ट करूनही त्यांच्या आयुष्यात बदल येत नाही. शरीर झिजतं, आयुष्य संपतं, आणि शेवटी अनेक जण व्यसनांच्या गर्तेत हरवून जातात. हा कोणता विकास? हा कोणता सामाजिक न्याय?

ड्रोन उडवायचेच असतील तर गावातील दलित वस्तीवर उडवा. शहरातील झोपडपट्टीवर उडवा. ऊसतोड कामगारांच्या तात्पुरत्या पालांवर उडवा. मग दिसेल की सामाजिक न्याय अजून किती दूर आहे. आकाशातून घेतलेले चमकदार दृश्य आणि जमिनीवर जगणाऱ्या माणसाचे दुःख यात किती मोठी दरी आहे, हे समजेल.

सामाजिक न्याय म्हणजे कार्यक्रम नाही. तो फोटोसेशन नाही. तो जाहिरातींचा विषय नाही. सामाजिक न्याय म्हणजे तळागाळातील माणसाला उभं करणं. वंचिताला अधिकार देणं. शोषिताला सन्मानाने जगण्याची ताकद देणं. आणि जोपर्यंत गावातील शेवटचा माणूस न्यायाने जगत नाही, तोपर्यंत कोणताही ड्रोन या व्यवस्थेचं अपयश लपवू शकणार नाही.

-दिपक केदार

#पँथरनामा

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!