आजचा लढा फक्त रस्त्यावर नाही, तर मोबाईलच्या स्क्रीनवरही सुरू आहे! – दिपक केदार

पूर्वी तलवारीने साम्राज्ये जिंकली जात होती, आज “नॅरेटिव्ह”ने समाजाची मानसिकता जिंकली जाते.जो खोटं वारंवार पेरतो, जो अफवा सातत्याने पुढे ढकलतो, जो सोशल मीडियावर भावनांचं व्यवस्थापन करतो — तोच लोकांच्या मनावर कब्जा करतो. हीच आजच्या काळातील सर्वात मोठी लढाई आहे.आंबेडकरी कार्यकर्ता प्रामाणिक आहे, भावनिक आहे, अन्याय झाला की रस्त्यावर उतरतो, आवाज उठवतो. पण शत्रू तसं करत नाही. तो आधी मुद्दा तयार करतो, मग तो पसरवतो, त्यावर वातावरण बनवतो आणि शेवटी समाजाला त्याच दिशेने विचार करायला भाग पाडतो.आपण प्रतिक्रिया देतो, ते अजेंडा ठरवतात — हा फरक ओळखण्याची वेळ आता आली आहे.खरात दलित होता हा खोटा नॅरेटिव्ह त्यांनी देशभर पसरवला. महाराष्ट्रात बोलले तर उत्तर मिळेल हे माहित असल्याने बाहेरच्या राज्यातील लोकांना पुढे केलं. सोशल मीडिया, युट्यूब, न्यूज चॅनेल, फेक अकाउंट्स — सगळ्यांचा वापर करून खोट्याला सत्यासारखं उभं केलं.हा योगायोग नाही, ही सुनियोजित यंत्रणा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित प्रभावी चित्रपट येतो, त्यात अठरा पगड जातींचा स्वराज्यातील सहभाग दिसतो, रयतेचा राजा दिसतो, आतला शत्रूही दिसतो… आणि त्याच वेळी महाराजांच्या उंचीवर चिखलफेक सुरू होते.कारण त्यांना माहित आहे — सत्य लोकांपर्यंत पोहोचलं तर त्यांचा खोटेपणा टिकणार नाही.आज एका नराधमाच्या गुन्ह्याचा वापर करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि संपूर्ण संविधानवादी विचारांवर हल्ला चढवला.मानवतेसाठी लोक रस्त्यावर उतरले होते, पण सोशल मीडियावर मुद्दा गुन्हेगारावरून वळवून जात, धर्म आणि द्वेषावर नेण्यात आला.हा अपघात नाही. ही त्यांची रणनीती आहे.प्रश्न असा आहे की हे लोक २४ तास इतके सक्रिय कसे?एका मिनिटात हजारो अकाउंट्स एकाच भाषेत पोस्ट कसे करतात?कोणते मुद्दे ट्रेंड करायचे, कोणते दाबायचे, कोणाला हिरो बनवायचं, कोणाला गप्प करायचं — हे इतकं संघटितपणे कसं घडतं?कारण ते युद्ध म्हणून लढत आहेत…आणि आपण अजूनही फक्त प्रतिक्रिया देण्यात अडकून आहोत.आता बदलण्याची वेळ आली आहे.आंबेडकरी तरुणांनी फक्त भावना नाही तर डिजिटल रणनीतीही समजून घेतली पाहिजे.आयटी क्षेत्रातील, सोशल मीडिया हाताळणारे, डिझाईन, एडिटिंग, डेटा, रिसर्च करणारे तरुण पुढे आले पाहिजेत.कारण आजचा लढा फक्त विचारांचा नाही, तर माहितीच्या नियंत्रणाचाही आहे.आपण व्यक्त होतो…पण आता मुद्दे निर्माणही करावे लागतील.आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक खोट्या प्रचाराला तथ्यांनी, संघटनाने आणि आधुनिक पद्धतीने उत्तर द्यावं लागेल.सज्ज व्हा…कारण हे युद्ध आता आभासी दुनियेतलं आहे.आणि जो समाज स्वतःचा नॅरेटिव्ह उभा करतो, इतिहास शेवटी त्याच्याच बाजूने उभा राहतो.



