ताब्यात असलेले सर्व गायरान कायम करा, अन्यथा महसूल मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही : दीपक केदार यांचा इशारा
बीड : करचुंडी गावातील शेकडो एकर गायरान जमिनीच्या कायमस्वरुपी हक्कासाठी मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला की 2010 पर्यंत ताब्यात असलेल्या सर्व गायरान जमिनी धारकांच्या नावावर करण्यात याव्यात, अन्यथा महसूल मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
करचुंडीतील नागरिकांनी याआधी दोन वर्षे गावात आंदोलन केले होते. त्यानंतर लॉंग मार्च काढून बीडपर्यंत पोहोचले तरीही प्रश्न मार्गी लागला नाही. अखेर ते पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. आंदोलकांची मागणी आहे की त्यांच्या ताब्यातील गायरान जमिनी तात्काळ त्यांच्या नावावर कराव्यात, सातबारा द्यावा आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
आंदोलकांचा आरोप आहे की दलितांचे पीक असतानाच या जमिनी वनविभागाकडे वर्ग करण्यात आल्या.दीपक केदार यांनी आंदोलनस्थळी बसूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकरण मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की गायरान हा आमच्या जीवनाचा आधार आहे. आमच्या पूर्वजांनी झाडं लावून जमीन कसली, पण आज तीच जमीन सरकार हिसकावून घेत आहे. गरिबांच्या जमिनी लाटून श्रीमंतांसाठी सौरऊर्जा प्रकल्प आणले जात आहेत, मात्र या प्रकल्पाचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होत नाही. गायरानचा एक इंचही आम्ही सरकारला देणार नाही.
पॅंथर सेनेचे कार्यकर्ते म्हणून जेसीबी घुसू देणार नाही.केदार यांनी पुढे सांगितले की सरकारने दादासाहेब सबलीकरण योजना व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ गावकऱ्यांना दिला पाहिजे. घरकुल, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता तातडीने दूर करावी. सामाजिक न्यायाच्या तत्वांनुसार वंचितांना न्याय दिला पाहिजे.
त्यांनी निवडणुकीच्या संदर्भातही इशारा देताना सांगितले की जर गायरान जमिनींचा प्रश्न मार्गी लागला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली जाईल. आम्हाला एकदा फसवलं, पण आता आम्ही मतदार म्हणून गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद गोळे, जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, कार्याध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा महासचिव पश्चिम पठाण, युवा जिल्हाध्यक्ष सुंदर वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



