छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑल इंडिया पँथर सेना स्वबळावर लढणार – दीपक केदार

छत्रपती संभाजीनगर : बुद्धलेणीजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात जिल्हाधिकारी स्वामी व तहसीलदार परेश चौधरी यांना सहआरोपी करून त्यांची संपत्ती जप्त करावी व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे. या संदर्भात राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
ओबीसी आरक्षण संपले अशी अफवा पसरवल्याने समाजात तणाव निर्माण झाला असून, राज्यात दंगल भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली.
पँथर सेनेने लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला असून, अशा व्यक्तींना राज्यात सभा घेण्यास बंदी घालावी, अशी भूमिका घेतली आहे. तसेच हाके यांनी उमरी येथील मातंग तरुण-धनगर मुलगी प्रेमप्रकरणाबाबत आधी भूमिका स्पष्ट करावी, असेही संघटनेने म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी प्रस्थापित मराठा नेत्यांच्या नेतृत्वातच मंत्रीपदे भोगली असून, त्यांनी कधीही ओबीसींसाठी स्वतंत्र पक्ष उभा केला नाही. त्यामुळे ते खरे ओबीसी नेते नाहीत, असे वक्तव्य पँथर सेनेने केले.
राज्यात दलितांवर हल्ले, अत्याचार वाढले असून, सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली गायरान जमीन हिसकावली जात आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडाला 10 महिने उलटूनही मारेकरी पकडलेले नाहीत. कामगारांना 12 तास ड्युटीचा मनुवादी निर्णय सरकारने घेतला असून, हा निर्णय अदानी-अंबानींसारख्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी आहे, असा आरोप पँथर सेनेने केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पँथर सेनेने जाहीर केले की, मान-सन्मान मिळाल्यास समविचारी पक्षांशी युती केली जाईल, अन्यथा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. प्रभाग पद्धतीमुळे बहुसंख्य दलित प्रभाग तोडण्यात आले असून, दलित-मुस्लिम वॉर्डचे विभाजन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
राज्यभर महाबोधी बुद्धविहार मुक्ती लढा, बुद्धलेणी बचाव, सोमनाथ सूर्यवंशी न्याय, दलित अत्याचार, गायरान जमीन, दलित जमीन हक्क, सामाजिक न्याय विभागासाठी स्वतंत्र बजेट कायदा यांसारख्या शेकडो मागण्यांवर आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे सुभेदारी गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली करण कलियाना यांची जिल्हाध्यक्षपदी, तर अमूल गडवे यांची जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांचे स्वागत महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे, समन्वयक अविनाश हिवाळे, अमोल नरवाडे, रवी नरवडे, कुणाल दांडगे, कमलेश दाभाडे, अक्षय वाकोडे आदींनी केले.
पत्रकार परिषदेसह कार्यकर्त्यांची व्यापक बैठक यावेळी संपन्न झाली.



