आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही” — बीड येथील एससी-एसटी बचाव आरक्षण मोर्चात दीपक केदार यांची भूमिका

बीड : येथील एससी-एसटी बचाव आरक्षणाच्या मोर्चामध्ये नेतृत्व करण्यासाठी दीपक केदार यांनी दाखल होताच मोर्चाची ताकद वाढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला.
यावेळी बोलताना दीपक केदार यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. ते म्हणाले की, “एससी आणि एसटीचे आरक्षण हे मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. दहा ते बारा कसोट्या पार करून मिळालेले हे आरक्षण आहे. त्यामुळे या आरक्षणामध्ये कुणालाही घुसखोरी करता येणार नाही, याची जाणीव केंद्र आणि राज्य सरकारला आहे. परंतु ज्या जातींना एसटीमध्ये आरक्षणाची मागणी करायला लावली जाते, त्या जातींच्या मतासाठीच राजकारण होत आहे. बंजारा असो की धनगर, त्यांच्या समस्या गंभीर आहेत. मेंढपाळांचे जीवन असो की तांड्यावर जगणाऱ्यांचे, त्यांच्यासाठी राज्य सरकारने योजनांची भूमिका घ्यावी. पण त्यांना आरक्षण घेतलं, एसटीतून घेतलं तरच बदल होईल, असे सांगणारे हे राजकीय पुढारी आहेत. या दोन्ही समाजाची दिशाभूल करून राजकारण केलं जात आहे.”
ते पुढे म्हणाले की, “70 वर्षांत कधी शरद पवारांनी माढामधून, तर कधी सुप्रिया सुळे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना आम्ही एसटीतून आरक्षण देऊ, असे म्हणून मतं घेतली. परंतु ती फक्त दिशाभूल होती, हे धनगर-बंजारा समाजाने आता ओळखले पाहिजे. देवेंद्र फडणवीस संघाचा मनवादी विषमतेचा अजेंडा चालवत आहेत. आरक्षणविरोधी धोरणांमुळे जाती-जातींमध्ये, गटांमध्ये भांडण लावले जात आहे आणि आरक्षण धोक्यात आणले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, हेच सरकारला कळत नाही. मराठा समाजासाठी जीआर काढल्यानंतर अचानक एसटीतून आरक्षणाची मागणी करणारे मोर्चे निघाले, आणि त्या मोर्चांचे नेतृत्व करणारे सगळे भाजपाचे नेते आहेत. ओबीसीसाठी बनवलेली समितीही भाजपाची आहे. त्यामुळे कुठेतरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, खोडा घालायचा म्हणून एसटीतून आरक्षणाची मागणी केली जाते, एसीमध्ये काही जाती बसवण्याची मागणी केली जाते, आणि सगळं आरक्षण गुंडाळून टाकण्याचा हा आरएसएस सरकारचा अजेंडा उघड झालेला आहे.”
दीपक केदार यांनी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत म्हटले, “आजही पारधी समाजाचे, भिल्ल समाजाचे, दलितांचे जीवनमान सुधारलेले नाही. गावकुसात त्यांच्यावर हल्ले होतात. इंग्रज ‘चोर’ असा शिक्का कपाळावर मारून गेले, पण शंभर वर्षांत या व्यवस्थेने तो शिक्का पुसला नाही. जे मिळालं ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, आणि न मिळालेलं खायला आलेल्यांना आम्ही घुसू देणार नाही. आजही आमच्या लेकरांचे चेहरे कुपोषित दिसतात. एका वेळचे पोटसुद्धा नीट भरू शकत नाही. आजही आम्ही या स्वातंत्र्याला विचारतो की सांग, तू कुठे आहेस? आमच्यावर जनावरांसारखे हल्ले होतात. माणूसपणाने जगण्याची संधी मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत आमच्यासारख्या तुकड्यांचा ताट हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला तर तो आम्ही खपवून घेणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, “जे कायद्यात बसत नाही, संविधानात बसत नाही, ते देण्याची भाषा करून मतं घेतली जातात. त्यापेक्षा दुर्दैव काही असू शकत नाही. आम्ही विचारतो – शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठे आहे? रोजगार कुठे आहे? आर्थिक समानता कुठे आहे? सामाजिक न्याय कुठे आहे? आमची घरं कुठे आहेत? आमची जमीन कुठे आहे? आम्हाला काहीच मिळत नाही. आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो, तेव्हा सरकार आरक्षणावर बोलते. निवडणुका आल्या की आरक्षणाची आंदोलने आणली जातात. अशा प्रकारे लोकांना भीती दाखवून सरकार भांडवलदारांच्या घशात उद्योग आणि जमिनी घालते. आरएसएसचे हस्तक स्टेजवर जाऊन ‘आरक्षण देऊ’ अशी भाषा करतात, पण डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला पाया मजबूत आहे.”
दीपक केदार यांनी इशारा दिला की, “आता यापुढे एससी आणि एसटी एकत्र येऊन बाबासाहेबांनी दिलेलं वाचवण्याचा लढा देणार. अस्तित्व जिवंत ठेवणार. नंदुरबारला आमचा जय वाळवी मारला गेला, त्यासाठी एसआयटी-सीआयडी लागत नाही, उलट आमच्या समाजाचा कोंबिंग करून विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद केले जाते. पारधी समाजाची घरे बीड जिल्ह्यात जाळली गेली, तिथे मीच धावलो. अनेकांनी मला स्टेज आणि मीडियासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली, पण आम्ही मीडिया आणि स्टेजसाठी जगणारे नाही. आम्ही शोषितांसाठी लढतो. शिक्षण आमच्यापर्यंत आलेलं नाही. शाळा टिकल्या नाहीत. भटकंती थांबलेली नाही. शिकारीवर जगावं लागतं. पण लक्षात ठेवा – शिकारीचे पिंजरे मजबूत आहेत. फडणवीस जर आमच्या आरक्षणाला हात लावला, तर या पिंजऱ्यात घालायला वेळ लागणार नाही.”ते म्हणाले, “मुंबईसारखं कोणी पॅक करू शकत नाही. वसई, पालघर, नाशिक, नंदुरबारचे आदिवासी लढणारे आहेत. आम्ही जेव्हा घुसू, तेव्हा मागण्यासाठी नाही तर घेण्यासाठी. आमच्या घोषणा या क्रांतीच्या असतील. त्यामुळे मतासाठी काही समाजाची दिशाभूल करू नका आणि आमच्यावर पाठवू नका. एकजुटीने आमच्या अस्तित्वासाठी हा लढा आता तीव्र करणार आहे. एससी-एसटी आरक्षण जिंदाबाद होतं आणि जिंदाबाद राहील.”
यावेळी विचारमंचावर आदिवासी समाजाचे नेते लक्कीभाई जाधव, मातंग, अजिंक्य भैय्या चांदणे, नितीन सोनवणे, युवराज बर्डे आदी एससी-एसटी नेते उपस्थित होते.



