Uncategorized

एनसीपी : स्वायत्त पक्षाकडून ‘सेल आघाडी’ पर्यंतचा प्रवास!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची अवस्था पाहिली, तर तो स्वतंत्र राजकीय पक्ष कमी आणि भारतीय जनता पक्षाची एक ‘सेल आघाडी’ अधिक भासू लागला आहे. वैचारिक स्वायत्तता, संघटनात्मक निर्णयक्षमता आणि राजकीय आत्मभान या तीनही बाबींपासून एनसीपी हळूहळू दूर जात आहे. या प्रक्रियेत अजित पवार हे एकटे पडलेले नेते म्हणून समोर येतात.

अजित पवार यांनी कधीही हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला नाही, किंवा पक्षाला त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, भाजपच्या कार्यपद्धतीवर, ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर आणि घोटाळ्यांच्या शक्यतेवर त्यांनी उघडपणे भाष्य केले. त्यांच्या भाषणांचा सूर शेवटच्या काळात अधिकच आक्रमक, विसंगत आणि सत्तेच्या चौकटीबाहेर जाणारा होता. कधी ते राजकारणालाच नाकारताना दिसत, तर कधी एकत्र येण्याचे संकेत देत. ही अस्वस्थता अपघाती नव्हती, तर राजकीय कोंडीचे लक्षण होती.

शरद पवार यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले की, अजित पवार विलीनीकरणाच्या तयारीत होते आणि त्यासाठी तारीखही ठरली होती. तरीही, त्या  प्रक्रियेत अजित पवार गटातील अनेक नेते अनिच्छुक होते. चार प्रमुख नेत्यांनाविलीन व्हायचे नव्हते. मात्र, या अंतर्गत विरोधाला न जुमानता पक्ष हळूहळू भाजपच्या कक्षेत ओढला गेला.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये हे चित्र अधिक स्पष्ट झाले. अजित पवार हेच एकमेव स्टार प्रचारक होते. पटेल, भुजबळ, मुंढे हे नेते त्या काळात जवळजवळ अदृश्य होते. छगन भुजबळ निवडणूक काळात रुग्णालयात होते, मात्र निकालानंतर लगेचच राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले. आजारपण आणि राजकीय सोय यातील सीमारेषा धूसर झाल्याचे हे उदाहरण होते. दुसरीकडे, अजित पवार सभा घेत असताना, धनंजय मुंढे अमित शहांच्या भेटीला जात होते. हे विरोधाभास योगायोग नव्हते, तर पक्षातील दुभंगलेपणाचे संकेत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान वापरलेले वाक्य — “१५ जानेवारीनंतर अजित पवार बोलणार नाहीत” — आज मागे वळून पाहताना अर्थपूर्ण वाटते. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या आणि त्यातून पक्षात असंतोष निर्माण झाला. अजित पवार बंडाच्या तयारीत होते, पण त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय ‘नाग्या टाकल्या’. परिणामी, बंडाचा शेवट झाला आणि पक्षच भाजपच्या दावणीला बांधला गेला.

विलीनीकरणाच्या बैठकीचा जो व्हिडिओ बाहेर आला आहे, त्यात अजित पवारच दिसतात. सुनील तटकरे यांनी ती बैठक कृषीविषयक असल्याचे सांगितले, मात्र ते स्वतः त्या बैठकीत नसणे अनेक प्रश्न निर्माण करते. त्यातच, दुखवटा अवघ्या दोन दिवसांत संपतो आणि लगेच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. हे सगळे घटनाक्रम राजकीय संवेदनशीलतेचा अभाव दाखवतात.

आज एनसीपीचे बहुतांश नियंत्रण भाजपच्या हातात गेले आहे. देवेंद्र फडणवीस हे जणू ‘शॅडो राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून वावरताना दिसतात. कधी काळी दलित पक्ष आणि आघाड्यांना हिणवले जात होते; आज त्याच एनसीपीची अवस्था भाजपच्या सेल आघाडीप्रमाणे झाली आहे. “भाजप म्हणजे एनसीपी आणि एनसीपी म्हणजेच भाजप” असे चित्र तयार झाले आहे.

कंगना रानौत यांच्या घरी संघाचे बौद्धिक वर्ग होतात आणि त्यात सुनेत्रा पवार सहभागी असल्याचे समोर येते. यावरून स्पष्ट होते की, त्या संघाच्या वैचारिक प्रभावाखाली आहेत आणि भाजपशी निष्ठावान राहणार आहेत. अजित पवार यांनाही याची कल्पना नसल्याचे त्यांनीच सांगितले — “माझी बायको तिकडे कशी गेली, मलाच माहिती नाही.” हे विधानच या सगळ्या प्रक्रियेतील त्यांचे एकाकीपण अधोरेखित करते.

म्हणूनच प्रश्न उरतो — अजित पवार यांना जाणूनबुजून राजकीय कोंडीत पकडण्याचा डाव रचला गेला होता का? भाजपपासून ते लांब का राहत होते? त्यांना नेमकं काय कळलं होत? या प्रश्नांची उत्तरं कदाचित लगेच मिळणार नाहीत, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे — एनसीपीचा स्वतंत्र राजकीय अध्याय संपत चालला आहे, आणि तो भाजपच्या छायेत विरत चालला आहे.

#PantherNama


पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!