Uncategorized

महादेव मुंडे हत्याकांड : ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक; SIT, CID चौकशीची मागणी!

बीड, ५ जुलै २०२५: परळी येथील गरीब वंजारी समाजातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याकांडाला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीही या प्रकरणातील मारेकरी मोकाट असल्याने ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच SIT आणि CID मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.

तसेच, गृहमंत्र्यांनी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात या तपासासंदर्भात निवेदन सादर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर त्यांच्या आई आणि पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी सातत्याने आंदोलने केली आहेत. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही. यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा बांगर यांनी काही संशयितांची नावे उघड केली होती. या आरोपांच्या चौकशीसाठी तातडीने पावले उचलावीत आणि सर्व संशयितांना ताब्यात घेऊन कसून तपास करावा, असे दीपक केदार यांनी नमूद केले.

महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच आमचा पाठिंबा आहे. त्यांच्या पत्नीने उपोषण केले तेव्हाही आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता आणखी विलंब नको. या प्रकरणात थेट आरोपींना अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे केदार यांनी X वर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

यापूर्वी आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात राजकीय दबावामुळे तपास रखडल्याचा आरोप केला होता. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवला आहे. मात्र, तरीही प्रगती न झाल्याने मुंडे कुटुंबीय आणि ऑल इंडिया पँथर सेना यांचा संताप वाढत आहे.

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासण्याची मागणी सरकारकडे केली आहे. “माझ्या पतीचा कोणाशीही वैर नव्हता. त्यांचा भिशी आणि सावकारीचा व्यवसाय होता. तरीही त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

ऑल इंडिया पँथर सेनेच्या या मागणीला सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सेनेने दिला आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!