“वैष्णवी हत्याकांड: या सगळ्या मागे आक्का आहे!” – ऑल इंडिया पॅंथर सेनेचा गंभीर आरोप

पुणे: ३0 मे २०२५: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली असताना, आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी वैष्णवीच्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीय अस्वस्थ असल्याचे दिसून आले असून, ते न्यायासाठी मोठा लढा लढत आहेत. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी समाजमाध्यमांशी संवाद साधताना पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली.
दीपक केदार म्हणाले, “निलेश चव्हाण या चिल्लर आरोपीला अटक करण्यास पुणे पोलिसांना १२ दिवस का लागले? हे पोलिसांचे स्पष्ट अपयश आहे. वैष्णवीच्या हत्येत निलेश चव्हाणची कसून चौकशी व्हायला हवी. या सर्व प्रकरणामागे राजकीय आक्का आहे, ज्याने या आरोपींना बळ दिले आहे.” त्यांनी वकिलांवरही गंभीर आरोप केले. “वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोलून तिच्या कुटुंबाला दुखावण्याचे काम केले आहे. यामागेही काही आक्का आहे. वैष्णवीबद्दल समाजात निर्माण झालेली सहानभूती नष्ट करण्याचा हा डाव आहे. असे करणाऱ्यांना तिच्या आई-वडिलांनीही आत्महत्या करावी असे वाटते का?” असे संतप्त उद्गार त्यांनी काढले.
केदार यांनी पुढे सांगितले, “येत्या ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी समाज बांधवांनी एकत्र येऊन हुंडा प्रथा जाळण्याची शपथ घ्यावी. जिजामातांच्या नावाने कठोर कायदा करावा, ज्यामध्ये संपत्ती जप्त करणे आणि हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा अशी तरतूद असावी.” त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवरही टीका करत राजीनाम्याची मागणी केली. “गोचीडासारखे खुर्चीला चिटकून बसू नये. संवेदना आणि नैतिकता असेल तर आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी जालिंदर सुपेकर यांच्यासह या प्रकरणामागील मूळ सूत्रधारांचा तपास करण्याची मागणी केली. “वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे. तिचे कुटुंब आजही भयभीत आहे, त्यांना मोठे संरक्षण द्यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या भेटीवेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश भाई जगताप, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले, पश्चिम महाराष्ट्राचे नेते संतोष शेंडगे, पुणे जिल्ह्याचे नेते ज्ञानेश्वर शिंदे, अनिल गायकवाड, किरण गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑल इंडिया पॅंथर सेनेने पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



