धुळे : दीपक केदार यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची बैठक, लांडोर बंगला स्मारकासाठी मोर्चाची रणनीती!

धुळे, दि. 23 मे 2025: दीपक केदार यांनी धुळे दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरे जावे, यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
नव्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश, धुळेतील विविध प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली.लळींग येथील ऐतिहासिक लांडोर बंगला, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती, त्या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक खानदेश आणि महाराष्ट्रातून येतात. मात्र, या ठिकाणी रस्ता आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
यासाठी लांडोर बंगला स्मारक म्हणून घोषित करावा आणि तिथपर्यंत चांगला रस्ता व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. यापूर्वी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते यांच्या नेतृत्वात यासंदर्भात आंदोलन झाले होते. आता लवकरच मोठा मोर्चा काढून ही मागणी अधिक तीव्रतेने मांडण्याची रणनीती यावेळी ठरविण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना सागर मोहिते यांनी सांगितले की, दीपक केदार यांचा दोनदिवसीय दौरा यशस्वीपणे सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही सखोल चर्चा झाली असून, पक्ष पुढील काळात या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा देणार आहे.