Uncategorized

कर्नाटकातील मानकापूर येथे ऑल इंडिया पँथर सेनेची शाखा स्थापन; दीपक केदार यांचा दलित हक्कांसाठी लढ्याचा इशारा

बेळगाव, १८ जून २०२५: कर्नाटकातील मानकापूर येथे ऑल इंडिया पँथर सेनेची शाखा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली आणि हस्ते स्थापन झाली. या प्रसंगी जनतेला संबोधित करताना दीपक केदार यांनी कर्नाटकात पँथर सेनेच्या विस्ताराचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, “आता कर्नाटकात पँथर सेनेची जोरदार एन्ट्री झाली आहे. बिदर, भालकी, विजापूर, निपाणी आणि आसपासचा परिसर पँथरमय करणार आहोत. मी स्वतः या भागांचा दौरा केला असून, येथील १८ पगड जातींच्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.”

केदार यांनी कर्नाटकातील सामाजिक अन्याय आणि दलितांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “महाराष्ट्रात रमाई घरकुल योजने अंतर्गत मिळणारी सुविधा कर्नाटकातही आहे, परंतु येथे केवळ १ लाख २० हजार रुपये दिले जातात आणि तेही अर्धवट घर बांधलेले असताना निधी मिळवण्यासाठी सरकार टाळाटाळ करते. जमिनीच्या मालकीसाठी कोणतेही ठोस धोरण नाही आणि समाजकल्याण योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत. त्यामुळे कर्नाटक सामाजिक अन्यायाचे केंद्र बनत चालले आहे.”

दलित समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांसाठी पँथर सेना जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “रोजगार, मूलभूत सुविधा आणि एससी-एसटी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही लढा देऊ,” असे आश्वासन त्यांनी कर्नाटकवासियांना दिले. यावेळी मानकापूर तालुका अध्यक्षपदी अमर तळवार यांची निवड जाहीर करण्यात आली.

शाखा स्थापनेच्या उद्घाटन प्रसंगी फलकाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रवक्ते नितीन सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र नेते व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. गणेश वायकर, पश्चिम महाराष्ट्र नेते स्वप्निल खांडेकर, सांगली जिल्हाध्यक्ष गिरीश सर्जे, औरंगाबाद नेते अविनाश हिवाळे, सोशल मीडिया आयटी समन्वयक शरद साळवे, बेळगाव जिल्हा नेते शिंदे, निपाणीचे अमर दाभाडे आणि सुरेश माने उपस्थित होते.

दीपक केदार यांनी राज्य सरकारला इशारा देताना सांगितले, “दलित समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आम्ही आता धावून येणार आहोत. कर्नाटकातील दलित समाजाच्या न्यायासाठी पँथर सेना कटिबद्ध आहे.”

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!