जातीय शैक्षणिक अत्याचारावर पँथर सेनेचा संताप – राज्य सरकारकडे ठोस कारवाईची मागणी

वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या ऋतुराज कांबळे या विद्यार्थ्यावर शिक्षक शहा यांनी अमानुष पद्धतीने मारहाण केली. या घटनेमुळे केवळ एका विद्यार्थ्याचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आलेले नसून संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रातील आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला मुद्दाम टार्गेट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना तीव्र निषेध नोंदवत असून राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. संस्थाचालक व संबंधित शिक्षक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका सेनेने मांडली आहे.
पँथर सेनेने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
- निर्दयी शिक्षक शहा व शाळा चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.संस्थाचालकाला सहआरोपी ठरवावे.
- शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेची मान्यता रद्द करावी.
- पोलीस आयुक्तांनी शाळेला भेट देऊन तपास सुरू करावा.
- शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावेत.
- राज्यभरातील आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार द्यावा.
- शैक्षणिक अत्याचाराच्या या घटनेची अनुसूचित जाती-जमाती आयोगाने व गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी.
- खाजगी शाळा बंद करून सरकारी शाळा सुरु करण्याची दिशा ठरवावी.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित विद्यार्थ्याच्या जखमा पाहिल्या व तातडीने पोलिसांशी संवाद साधून कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी महाराष्ट्राचे महासचिव सचिन तिवारी, महाराष्ट्र प्रवक्ते, महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी दादा सदाशिवे, औरंगाबाद जिल्ह्याचे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश हिवाळे, शहराध्यक्ष कुणाल दांडगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
पँथर सेनेचे आवाहन आहे की, सर्व पालकांनी अशा अमानवीय अत्याचारांविरोधात ठामपणे उभे राहावे आणि आपल्या मुलांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र यावे.



