Uncategorized

नांदेड येणारी निवडणूक स्वबळावर लढणार पॅंथरचा स्वाभिमानी नारा

नांदेड – येणाऱ्या निवडणुकीत ऑल इंडिया पॅंथर सेना स्वबळावर लढणार असल्याचा स्वाभिमानी नारा आजच्या बैठकीत देण्यात आला. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांनी केले होते.बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. तालुकाध्यक्षांनी आपल्या भागातील प्रश्न, संघटनबांधणी आणि येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात भूमिका मांडल्या. सर्वांच्या मतांची नोंद राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली.जिल्हाध्यक्ष माधव भालेराव म्हणाले, “मला पॅंथर सेनेने ओळख दिली. जिल्हाभरात संघटना उभारली. आता केदार साहेबांच्या हाताला बळकटी देण्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद द्यावी लागेल. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा विजय होणे आवश्यक आहे.

कार्यकर्त्यांनी लढाऊ व आक्रमक संघटनेत सामील व्हावे.”यावेळी दीपक केदार म्हणाले, “ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्रातील सर्व अन्याय-अत्याचाराविरुद्ध नेहमी आवाज उठवत आली आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आपण मोठी क्रांती घडवून आणली, बहुजनांना एकत्र केले, मानवतेचा लढा उभारला. आता भावनिक मुद्यांपलीकडे जाऊन निवडणुकीचे गणित समजून घ्यावे लागेल.

वार्ड, प्रभाग, सर्कल यांचा अभ्यास करून आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि जिंकल्या पाहिजेत.”ते पुढे म्हणाले, “आज आपण खासदार नाही, आमदार नाही, पण आपले निवेदने, पोस्ट सरकार दखल घेतं, ॲक्शन घेतं. त्यामुळे पॅंथरचा दरारा आहे. पण त्यापलीकडे जाऊन आपलेच लोकप्रतिनिधी निवडून आले, तरच सामाजिक न्यायाचे प्रश्न सुटतील.

सध्या सामाजिक न्यायाचा निधी झोपवला जातो, तरुणांना गायीच्या आरोपाखाली मारलं जातं, मुस्लिम तरुणांचा छळ होतो, ऑनर किलिंग व महिला अत्याचार वाढतात. अशावेळी आपण स्वस्थ बसू शकत नाही. संविधान बदललं जात नाही, पण त्याची मूल्यं नाकारण्याचं काम सुरू आहे. आपला लढा गावपातळीपर्यंत पोहोचला पाहिजे.

”केदार यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “ट्विटरवर मनुवादी गट फार सक्रिय आहेत. मात्र आंबेडकरी तरुण मागे आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने ट्विटर अकाउंट उघडून आपली लढाई सोशल मीडियावरही तीव्र करावी. सोशल मीडियाचा वापर विचार पोहोचवण्यासाठी करा, कार्यासाठी करा. चुकीच्या सवयींपासून दूर राहा.

”ते पुढे म्हणाले, “नांदेड हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. पूर्वी येथे आमदार, खासदार, नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले, पण आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुका लढवण्याची तयारी ठेवा. विचारधारेशी निगडित पक्षांसोबत युती करायला हरकत नाही; पण कुणी कमीपणा दाखवला तर आपण गुलामगिरी मान्य करणार नाही.

स्वाभिमानाने स्वबळावर निवडणुका लढायच्या आहेत.”ते म्हणाले, “आता आम्ही इतरांचे पैसे वाटणार नाही, मत विकणार नाही. जातीपुरते मर्यादित राहायचे नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी संघर्ष केला. आपण व्यापक सामाजिक न्यायाच्या लढ्यात पुढे जावे. फक्त दलित, आदिवासी नव्हे तर इतर शोषित वर्गासाठीही लढा दिला पाहिजे. बदल घडवण्यासाठी व्यापक राजकीय भूमिका घ्यावी लागेल. सकारात्मक रहा, एकजूटीने लढा द्या, गावागावात शाखा उभारा. लोकांचे प्रश्न समजून घ्या आणि ताकदीने लढा.”शेवटी ते म्हणाले, “आज अस्तित्व धोक्यात आलं आहे, त्याला वाचवण्यासाठी संघटना वाढवा.

माझ्यासोबतचे कार्यकर्ते एकेकाळी गप्प होते, आज भाषण करतात, ही मोठी ताकद आहे. आपण 1972 च्या चळवळीप्रमाणे फळी तयार केली, तर पुन्हा वैचारिक क्रांती उभी राहील. समाजाच्या प्रश्नांची जबाबदारी आपली आहे आणि त्यासाठी मी कायम लढायला व मरायला तयार आहे. कार्यकर्त्यांनीही पूर्ण ताकदीने चळवळीत योगदान द्यावे.”

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!