∆युपी : चोरीच्या आरोपात दलित व्यक्तीला भयानक मारले, भाजपचा नेता अटक!

उत्तरप्रदेश : बहराइच जिल्हातील प्रकरण आहे. दलित तरुणावर चोरीचा आरोप केला, मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार या दलित तरुणाने फेसबुकवर राज्यातील योगी सरकारच्या धोरणावर टीका केली होती.
टॉयलेट सीट चोरल्याप्रकरणी एका दलित व्यक्तीला विजेच्या खांबाला बांधून त्याचा चेहरा काळा करून मारल्याची घटना उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक नेत्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक कुमार यांनी रविवारी सांगितले की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही लोकांनी एका 30 वर्षीय दलित व्यक्तीला खांबाला बांधले आणि त्याचा चेहरा काळा केला.
मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणामुळे अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. देशात दलित असुरक्षित आहे. झुंडीने जातीय प्रवृती दलितांना टार्गेट करतात. या घटनेतील आरोपी सत्ताधारी भाजप पक्षाचे आहेत. एकीकडे मोहन भागवत म्हणतात दलितांवर आम्ही अन्याय केला आता पापक्षालन केलं पाहिजे तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते दलितांना डांबून तोंडाला काळे फासून मारतात. ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत असून आरोपींवर कठोर कार्यवाही करावी दलितांना सुरक्षीत करावे असे मत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केले.