अमरेलीतील दलित व्यक्तीच्या हत्येने गुजरात हादरले: ‘बेटा’ म्हणणे जीवावर बेतले!

दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा पेटला; ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा
गुजरातमधील अमरेली येथे एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. एका दुकानदाराने केवळ ‘बेटा’ असे संबोधल्यामुळे एका दलित व्यक्तीवर, नीलेश राठोड याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नीलेशचा सहा दिवसांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सामाजिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
काय आहे घटना?
२३ मे रोजी अमरेलीतील सावरकुंडला रस्त्यावर नीलेश राठोड याने एका दुकानदाराच्या मुलाला ‘बेटा’ असे संबोधले. याचा राग आल्याने दुकानदाराने नीलेशवर हल्ला केला. या मारहाणीत नीलेश गंभीर जखमी झाला आणि सहा दिवसांनंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. मात्र, नीलेशच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली, परंतु पोलिसांनी वेळीच मदत केली नाही, ज्यामुळे नीलेशला वाचवणे शक्य झाले नाही.
कुटुंबाची मागणी: कठोर कारवाई व्हावी
नीलेशच्या कुटुंबाने फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. “आम्ही जराही मागे हटणार नाही. आमच्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी दोषींना कठोर शिक्षा आणि पीडिताला खरा न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेची आक्रमक प्रतिक्रिया
या घटनेची तीव्र दखल घेत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. “एका दलित व्यक्तीने ‘बेटा’ म्हटले म्हणून जर गुजरातमध्ये त्याला मारले जात असेल, तर हाच का नरेंद्र मोदींचा गुजरात मॉडेल आहे? १०० वर्षे झाली तरी दलितांना माणूस म्हणून जगता येत नाही. एवढ्याशा मुद्द्यावरून जर हत्या होत असेल, तर गुजरात कोणत्या दिशेने चालले आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार आहेत की नाही? जर दलितांबद्दल हाच जातिवादी दृष्टिकोन कायम राहिला, तर आम्हाला देशव्यापी पँथरची भूमिका घ्यावी लागेल. गुजरातमध्ये जातिवाद आणि वाद पेरला जात आहे. ‘पोलीस आमचेच, सत्ता आमचीच, कुणी आमचे काहीच करू शकत नाही,’ हा जो अविर्भाव तिथल्या जातिवाद्यांमध्ये दिसतो, तो संपला पाहिजे. हे कायद्याचे राज्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना अशा पद्धतीने टार्गेट केले जाणार असेल, तर येणाऱ्या काळात देशभरातील अन्यायाविरोधात बंड करावे लागेल.”
गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह
दीपक केदार यांनी पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारला, “हाच का तुमचा गुजरात मॉडेल आहे?” या घटनेमुळे गुजरातमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पातळीवरही या घटनेचा तीव्र निषेध होत असून, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटनांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
पोलिसांचा दावा: तपास सुरू
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. “आम्ही सर्व आरोपींना अटक केली आहे आणि प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, पोलिसांच्या या दाव्यावर स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे.



